Submit your work, meet writers and drop the ads. Become a member
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
चढण्याची केली घाई,
कुठे हरवला आनंद माझा
मलाच कळालं नाही.

स्वप्नं मोठी, इच्छा जास्त –
पण मेहनत केली नाही,
कुठे हरवला आनंद माझा
मलाच कळालं नाही.

सर्वांनी मला सावध केलेले,
पण मी लक्ष दिलं नाही,
कुठे हरवला आनंद माझा
मलाच कळालं नाही.

मेहनतीशिवाय मार्ग मला
कोणताच दिसत नाही,
हरवलेला आनंद माझा
मी पुन्हा शोधत राही.
ही कविता ०२ ऑगस्ट २०२० रोजी लिहिलेली आहे
बोलताना तुझ्याशी भान मी हरपलो,
तुला बघायला दररोज मी तरसलो.
भेटशील तू मला, ही आशा मनात होती,
पण भेटायला तुला योग्य संधी मिळत नव्हती.

मी मारलेल्या जोकवर तुझं खदखदून हसणं,
तू दिलेल्या सरप्राइजनं माझं आश्चर्यचकित होणं,
मी दुःखी असताना तुझे डोळे पाणावणं,
तू अडचणीत असताना माझं मदतीस सरसावणं.

आठवण येत होती मला कायम ह्या सगळ्याची,
पण तुझी सावलीदेखील माझ्या आसपास नसायची.
कायम मी जगायचो तुझ्या आठवणींमध्ये,
कायम मी बघत राहायचो तुझ्या फोटोकडे.

परत सोडून गेलीस तर जगणं अशक्य होईल मला,
माझ्या मनातली ही भावना मी कशी सांगू तुला?
कदाचित देवानेच आहे आपलं कनेक्शन जोडलेलं,
कारण नातं आहे आपलं शब्दांच्या पलीकडचं.
ही कविता ०२ जुलै २०२० रोजी लिहिलेली आहे
मनातल्या कोपऱ्यात आहे
आठवणींचा ठेवा,
ती बरोबर असण्याचा आनंद
त्यांच्याच मदतीने घ्यावा.

प्रेमात कायम जवळ असणं
हे गरजेचं नसतं,
लांब असूनदेखील मला
ओढ तुझीच असते.

सतत तुझा वाटतो अभिमान,
आनंददेखील होतो,
पण एकत्र आनंद साजरा करण्याचा
मोका माझ्याकडे नसतो.

माझी काळजी करू नकोस
असं मी कायम तुला सांगतो,
तुझ्या काळजीत मात्र मी
माझा प्रत्येक क्षण काढतो.
ही कविता २४ जून २०२० रोजी लिहिलेली आहे
समुद्रासारखं आहे आयुष्य –
कधी आनंदाची लाट, कधी दुःखाची सर.
रस्त्यासारखं आहे आयुष्य –
कधी अपयशाचा खड्डा, कधी यशाची भर.

आकाशासारखं आहे आयुष्य –
कधी स्वच्छ सोपं, कधी दाट अवघड.
शाळेतल्या वर्गासारखं आहे आयुष्य –
कधी स्मशान शांतता, कधी खूप बडबड.

आयुष्याच्या या तुलनांचा
खूप गहन अभ्यास करावा,
परिस्थितीच्या अटी पाहून मगच
आयुष्याचा फॉर्म भरावा.
ही कविता १२ जून २०२० रोजी लिहिलेली आहे
जन्म दिलास तूच मला,
आणि तूच मला वाढविलं,
सोनेरी दागिन्यासारखं एकदम
तूच मला घडविलं.

कधी चुकलो तर ओरडलीस मला,
कधी प्रेमाने जवळ घेतलंस,
कधी लागेल असं बोललीस मला,
कधी काळजीने पांघरूण घातलंस.

झेलल्यास माझ्या अडचणी
स्वतःवर तू सर्व,
आईसारखं नातं बनवणारा
थोडाच आहे तो निसर्ग.

कितीही काहीही झालं तरी
नाही देणार मी तुला अंतर,
आयुष्याच्या शेवटपर्यंत तुझ्यावर
प्रेम करीन मी निरंतर.
ही कविता ०६ जून २०२० रोजी लिहिलेली आहे
मन भरून आले तुला पाहून,
आठवण येत होती तुझी.
तुला सांगायचं गेले राहून
मनातली गोड भावना माझी.

सुंदर दिसत होतीस तू,
नेहेमीसारखीच हसत होतीस,
पण तुझ्या हसण्याचा आनंद तू
मला मिळून देत नव्हतीस.

खूप समजावलं मी मनाला माझ्या –
नको तिची आठवण काढूस,
आठवणींच्या पेटाऱ्याला तुझ्या
पाहून नको अश्रू गाळूस.

पण तरीही, कधीतरी दार वाजल्यावर
तू भेटायला आलीयस असं वाटतं,
दारात कोणी तरी दुसराच दिसल्यावर
मन पुन्हा एकदा तुटतं.
ही कविता ०५ जून २०२० रोजी लिहिलेली आहे
देव भेटला तर विचारेन त्याला –
तू ही सृष्टी बनवलीच कशाला?
का बनवलास तू हा सूर्य,
आणि का बनवलीस ही ग्रहमाला?

का पाणी तू निळंच बनवलंस,
का चंद्राला ठेवलास पांढरा?
आणि का आहेत हिरवी झाडं,
अन् का केशरी भंडारा?

का पृथ्वी सर्वात वेगळी?
का फक्त मानवच हुशार?
का मानव एवढा क्रूर,
आणि का प्राणी लाचार?

का मनुष्याने केली प्रगती?
का बदलली ही दुनिया सारी?
स्वतःला संपवण्याची करत आहे का
स्वतःच मनुष्य तयारी...?
ही कविता १० एप्रिल २०२० रोजी लिहिलेली आहे
Next page