कशात हुडकावा आनंद
हे आजकाल कळेनासं झालंय,
आनंदी राहायचं कारण
आजकाल मिळेनासं झालंय.
जुने दिवस आठवावे म्हणतो,
जरा भावनिक होईन म्हणतो...
पण मग पडतो प्रश्न येऊन –
की भावना तरी उरल्यात का आता?
आश्रू अनावर व्हायला,
ते अश्रू तरी उरलेत का आता?
प्रेमाला शोधायच्या आशेने
आयुष्याच्या जंगलात भटकतो,
खोट्या आशेच्या नदीत
थोडा वेळ पहुडतो.
पण होईन का मी ओला प्रेमाने त्या नदीत?
का होईल मला भास,
आणि पडेन मी दुःखाच्या दरीत?
का दिसेल मला मृगजळ
त्या भाबड्या, प्रेमळ हरणाचं?
जाऊदे ते सगळं –
मी जाऊन काहीतरी खातो,
पाणीपुरीतलं पाणी
जरा मिटक्या मारत पितो.
पण मग येतं डाएट आडवं
आणि दाखवतं जाडी माझी –
"३६ ची पॅन्ट घालायची लायकी आहे का तुझी?
पोटावर पडल्यात वळ्या,
आणि गाल झालेत गुबगुबीत,
हत्ती सारखे पाय तुझे,
शरीर दिसतंय बटबटीत!"
मग आठवतं मला करिअर,
आणि मिळवू म्हणतो पैसा...
करिअरच्या टेन्शनने
क्षीण होऊन जातो नाहीसा.
इतके श्रीमंत होऊ की
असेल बंगला, गाडी,
भरपूर फ्लॅट घेऊ,
महिन्याला येतील भाडी.
पण तिथे तरी हा माजोर्डा रूबाब
देईल का मला सुख?
आणि एवढं सगळं करून शेवटी मला
राहील का आनंदाची भूक?
कशात हुडकावा आनंद?
हे आजकाल कळेनासं झालंय...
आनंदी राहायचं कारण
आजकाल मिळेनासं झालंय.
ही कविता २८ मे २०२५ रोजी लिहिलेली आहे