Submit your work, meet writers and drop the ads. Become a member
Apr 2018
सकाळी उठल्यावर आधी झिपऱ्या बांधायच्या.
रात्री उशिरा झोपायची सवय लावून घेतलीस तर लग्नानंतर मोडणं कठीण होईल.
दिवसा वापरलेले डबे रात्री घासताना कुकरमधलं खालचं गरम पाणी वापर.
ऑफिसमधून घरी आल्यावर आधी कुकर लाव, नंतर कपडे बदल, म्हणजे तेवढा वेळ वाचतो.
हाक ऐकल्यावर आधी ओ द्यायची.
बाहेरून घरी आलं की, आधी पाय धुवायचे.
विरजण मागायला शेजारणीकडे संध्याकाळी जायचं नाही.
चहाकाॅफी पिऊन झाल्यावर कपात लगेच पाणी घालून ठेवायचं.
ताटातल्या मिरच्याकढीलिंबाची पानं काढून केरात टाकायची, सिंकमध्ये पाणी तुंबतं नाहीतर. सिंक च्या जवळ केराचा डबा ठेवायचा.
गूळ घातला की, भाजी नीट मिळून येते. फोडणीत साखर घातली की रश्श्यावर तवंग येतो.
धिरडं घातलं की, तुळशीला एक फेरी मारायची, नाहीतर ते शिजत नाही नीट. घरी एक तरी तुळस असायला हवीच.
काय गं कार्टे- ओ कोण, तुझा बाप देणार?
आणि गोट्या कसली खेळतेस, मुलगा आहेस का?
आता लहान नाहीयेस, एवढा मोठा मांडा ठोकून नाही बसायचं. आवर!
आजीआजोबांना तुमचे विचार समजवायला जाऊ नका, ते जवळजवळ अशक्य आहे.
कोणाकडे गेल्यावर मदत करू का असं आपणहून विचार.
उठल्याउठल्या हातासरशी अंथरूण आवरायची सवय लावून घे.
खाताना तोंडाचा आवाज करायचा नाही.
ओढणी घेतल्याशिवाय बाहेर पडू नकोस.
मोठमोठ्याने हसायचं नाही, आपल्याच घरी का होई ना.
चपलाबूट विकत घेण्यासाठी संध्याकाळी जायचं, तेव्हा पाय जरा सुजलेले असतात. सकाळी घेतले तर बूट चावू शकतात.
कुठेही असलीस तरी रात्री दात घासल्याशिवाय झोपायचं नाही.
झोपताना स्वच्छ मऊ सुती कपडे घालूनच झोपायचं.
उष्ट्या खरकट्या हाताने वाढायचं नाही.
लोणच्यात ओला चमचा घालायचा नाही.
पैसे झाडाला लागत नाहीत, जपून खर्च करायचे.
पैशाची किंमत कमवायला लागलीस कीच कळेल.
रांगाेळी काढता आली पाहिजे मुलीच्या जातीला, लग्नानंतर उपयोगी पडेल.
छोट्या छोट्या गोष्टींवर रडत बसायचं नाही, लग्नानंतर असली कौतुकं चालणार नाहीत.
दुसऱ्या जातीत/धर्मात/समाजात लग्न केलं तर बाईलाच तडजोडी कराव्या लागतात, त्याही स्वयंपाकघरात. नेहमीच्या सवयीचं जेवण नसेल तर माणसं कितीही प्रेमात असली तरी काही दिवसांनी बिथरू शकतात.
परक्या पुरुषांकडे पाहून दात काढून हसू नकोस.
अरे ला का रे करायला शीक.
तुझ्या शरीरावर हक्क फक्त तुझाच आहे, हे लक्षात ठेव.
कोपऱ्यावरच्या पानवाल्याला तुझं पान माहिती असलं पाहिजे.
भाज्या घेताना भाव करायची वेळ आली नाही पाहिजे. (जर आली तर?) एवढं सगळं सांगितल्यावर भाव करायला पण मीच शिकवायचं?
Based on Jamaica Kincaid's short story, 'Girl'. In collaboration with my mother, Mrinmayee Ranade, without whom this would have been a half-assed attempt in English.
Gargi
Written by
Gargi  India
(India)   
  1.2k
   Ravindra Kumar Nayak
Please log in to view and add comments on poems